साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?


🌼🌼🌼 || परमार्थ ||🌼🌼🌼

प्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ? साधकाने साधना काय व कशी करावी ? 
        साधनेने साधकाला काय प्राप्त होते ?

उत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.
श्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे लक्ष राहिले पाहिजे. त्यासाठी दर १०-१० मिनिटांनी हातात असेल ते काम सोडून १-२मिनिटे साधनेत घालवावी म्हणजे चोवीस तास अनुसंधानात रहाण्याची सवय होईल. झोपायच्या आधी एक घटकाभर साधनेला बसून मग झोपावे. साधना केली तर साधकाच्या भाग्याला पारावार नाही.शरीरसुख हे क्षणभंगुर, सापेक्ष, मर्यादित व अंती दु:ख देणारे आहे,
हे परमेश्वराने दाखवून दिले आहे. साधनेशिवाय जीवाला खरेखुरे सुख नाही हेच परमेश्वराला दाखवावयाचे असते. ते लक्षात घेऊन साधकाने साधना करावयास हवी. साधना निरपेक्ष आहे. निरपेक्ष स्थितीत सुख असल्याने, साधकाने साधनाच करावी. साधनेत आनंद असल्याने, जाणता साधक साधनेतच अधिक वेळ घालविण्याचा निश्चय व प्रयत्न करतो.साधनेने विश्रांति प्राप्त झाली की साधक शरीराला सुख हवे अशी इच्छाच बाळगत नाही. तक्रारच उरली नाही की त्याची साधना व्यवस्थित होते.जीवनात जीवन मिसळल्यावर प्राप्त झालेला आनंद साधनेने अखंड टिकवणे हेच साधकाचे काम आहे.साधनेचा अभ्यास करावयाचा असेल तर स्वस्थ बसले म्हणजे निम्मे साधले. स्वस्थ बसणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मानुभूति येण्यासाठी साधकाने स्वस्थ रहाण्यास शिकले पाहिजे.

निश्चळ दृष्टि, अलक्ष्यात लक्ष, काम करतानाही चैतन्याशी तादात्म्य या गोष्टी साधकाला जमल्या पाहिजेत.जो साधक साधनेच्या अभ्यासात आला, वृत्ति अंतर्मुख होऊन ज्याला स्वयंसिद्ध नामाच्या ध्वनीचे श्रवण घडू लागले आणि त्या ध्वनीशी तादात्म्यता होऊन लय सापडू लागली, त्याला प्रत्येक अनुभव एकामागून एक आपोआप येईल. साधनेत प्रकाश दिसणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे. तथापि अनुभव येऊनही काही वेळा विरोधी शक्ति साधकास नडविते. अंतर्यामी साधनेने श्वसनाचे ऐक्यात देवाची अखंड भेट घेणे जीवाला/साधकाला शक्य आहे. संकल्प-विकल्प लयाला गेलेला साधकच विज्ञानी होतो. विज्ञान म्हणजे ज्यातून हे सर्व निर्माण झालेले आहे ते होणे. विज्ञानाने बुद्धि प्रकाशित झाली की ती सर्वांतून परावृत्त होत असल्याने, साधक आत्म्याखेरीज अन्य काही पहावयास तयारच होत नाही.

|| जय सद्गुरु ||

Popular posts from this blog

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व