नामाचे प्रेम का येत नाही ?

नामाचे प्रेम का येत नाही ?

आज इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास, यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे. याचे खरे कारण हे की, त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते. या सर्व संतांच्या वचनांवर आपणविश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही, याचा विचार आपण करायला पाहिजे.

नामाला उपमा देताना, ते अमृतापेक्षाही गोड आहेअसे त्यांनी सांगितले. नामाला अमृताची उपमा देताना, त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे ?
तर त्या नामाच्या आड काही तरी येत असले पाहिजे हे खास.

ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावरआम्हाला जर ती गोड लागली नाही, तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल, तर आमच्यामध्येच काही तरीदोष असला पाहिजे खास.

नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारले, ‘नामाचे प्रेम का येत नाही ?’ तर तो सांगतो, ‘माझे लग्न झाले नाही. ते होऊन प्रपंच, मुलेबाळे, हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल.’ पण लग्न करून मुलेबाळे असलेल्या किती लोकांनानामाचे प्रेम लागले आहे ?

कोणी म्हणतो, ‘पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटतेआणि नामाचे प्रेम येत नाही.’ परंतु अगदी भरपूरपैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळविले आहे ?

कोणी म्हणतो, ‘या प्रपंचात बायकोमुले, आजारपण, शेतीवाडी, यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही;’ तर कोणी म्हणतो, ‘प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे; मी आता संन्यासघेतो, म्हणजे मला नामाचे प्रेम येईल;’ तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने, सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्यापरिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात.

नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते, नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल, तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही.

भगवंत हवा आहे असे वाटणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंतहवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल.

🌼 नामाची गोडी अशी विलक्षण आहे की, ज्याला ती लागलीत्याला स्वतःचे भान राहात नाही. म्हणून नामाला वाहून घ्यावे.🌼

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व