ज्ञान वैराग्य व सामर्थ्य ही फलश्रुती ( सदा संगती सज्जनांची धरावी )मनाच्या श्लोकांना महत्वाचे स्थान आहे. विनोबा भावे त्यांना ‘मनोपनिषद्’ असेच म्हणतात.

मनाच्या श्लोकात अनंत राघवाचा पंथ विवरण करून सांगितला आहे. रामानुसंधानाने आपल्याला जो आत्मसाक्षात्काराच्या अनुभवाचा आनंद प्राप्त झाला तो आनंद इतरांनाही भोगायला मिळावा अशी समर्थांना तळमळ होती. अशा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मन हे तयार करावे लागते. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:’ असे म्हटलेच आहे. मनामुळेच बंध व मनामुळेच मोक्ष प्राप्त होतो. मन ही एक विलक्षण चीज आहे. मनच मनुष्याला देवत्वाचा अथवा दानवत्वाचा मार्ग दाखवते.


आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मन: प्रग्रहमेव च ॥


असा कठोपनिषदात एक सुंदर श्लोक आला आहे. त्यात जीवात्म्यावर रथीचे (रथ चालवणार्‍याचे) रूपक केले आहे. जीवात्मा हा रथी असून शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धी हा या रथाचा सारथी असून मन म्हणजे लगाम आहे. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंदिये असे या रथाचे दहा घोडे आहेत. हा रथ योग्य मार्गावरून धावण्यासाठी मनरूपी लगाम हा बुद्धीरूपी सारथ्याच्या हातात असायला हवा. तरच सर्व घोडे एकाच दिशेने संचलित होऊन गंतव्यस्थान गाठता येईल. पण व्यवहारात घडते ते उलटेच. मन सारथी होते व बुद्धीला लगाम बनवते. त्यामुळे रथ चौखूर उधळतो व गंतव्य स्थान गाठता तर येत नाहीच पण जीवात्म्याला मात्र पुन्हा पुन्हा जन्म-मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी बुद्धीला पुन्हा आपल्या सारथ्यपदावर प्रतिष्ठित करावे लागते. त्यासाठी मनाने आपल्या सारथीपदाचा त्याग करणे आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी मनालाच उपदेश केला आहे. स्वत:च स्वत:शी संवाद साधून आत्मपरिवर्तनाचे एक वेगळेच तंत्र समर्थांनी विकसित केले आहे.

ब्रह्मविद्येचा अनादी पंथच श्रीसमर्थांनी मनाच्या श्लोकात उलगडून दाखवला आहे. खरा देव कोणता, तो प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कोणते करावयाचे, आडवाटा कोणत्या, त्य़ा कशा टाळायच्या, नामस्मरणाचे महत्व काय, खरे समाधान कसे प्राप्त करून घ्यावयाचे ते सर्व मार्गदर्शन श्रीसमर्थांनी या लहानशा ग्रंथात केले आहे.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसर्‍याच्या संगतीमधे रहावे लागणे अनिवार्य आहे. संगत ही परमार्थाला मारकही असू शकते किंवा पोषकही असू शकते. ऐहिकतेकडे, सुखासीनतेकडे मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो. पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बाणवावे लागतात.


जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ।
तिये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥


लागतात.
ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते. पण त्यामुळे मनाचे समाधान भंग पावते. देहाहंता येऊन चिकटलेली असतेच. पण ती दृढ व्हायला लागते. देहाहंता निर्मूळ करणे ही ब्रह्मविद्या प्राप्तीतील मुख्य गोष्ट आहे. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतात –


सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: स चेद्धातुं न शक्यते ।
स सद्भि: सह कर्तव्य: सन्त: सङ्गस्य भेषजम् ॥


सुभाषितकार म्हणतो की मुळात संगत कुणाची करूच नये. पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी.

समाजात राहून पूर्ण नि:संग होणे कुणाही मनुष्यास शक्य नाही. समाजात सज्जन-दुर्जन, चांगली, लबाड, वाईट सर्वच प्रकारची माणसे असतात. बहुजनांच्या संगतीत जर रहावे लागणारच असले तरी कोणाच्या संगतीत रहावे व कोणाच्या संगतीत राहू नये य़ाचे स्वातंत्र्य मनुष्याकडे आहे. तेव्हा मनुष्याने विवेकाने नास्तिक, लोभी, दुर्जन यांची संगत टाळावी व संतांची संगतच करावी.

संतांची व्याख्या करतांना समर्थ म्हणतात


करी वृत्ती जो संत तो संत जाणा । दुराशागुणे तो नव्हे दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते । परी सज्जना केवी बांधू शके ते ॥

संत-सज्जनांच्या संगतीत मानवी जीवनाचे सर्थक करायचे. पण असे संत लोक असतात तरी कसे ? त्यांची समर्थांनी वरील श्लोकात व्याख्या केली आहे. जो आत्मानात्मविवेक करून शाश्वत अशा ब्रह्मस्वरूपी वृत्ती स्थिर करतो तो संत. दासबोधातही समर्थ म्हणतात –

जो जाणेल भगवंत । तया नाव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥

निरीच्छता हे संतांचे मुख्य लक्षण आहे. प्रपंचाविषयीची स्वार्थी आशा त्याच्या मनात नसते. अशी दुराशा नसल्यामुळेच त्याच्याकडे दीनताही नसते. देहबुद्धी वाढवणारी उपाधी त्याला बांधू शकत नाही. तो हरिभक्त असूनही विरक्त असतो. तो ज्ञाता असतो. त्याला आत्मानुभव आलेला असतो. एक अंतरात्माच चराचरात भरून राहिलेला असून तोच आपले खरे स्वरूप आहे असे विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान त्याच्या अनुभवास आलेले असते. . त्यामुळे त्यांना कोठेही द्वैत दिसत नाही. जेथे द्वैत असते तेथे भय असते. संत सर्व ठिकाणी ऐक्यच पहात असल्यामुळे ते भयातीत असतात. .

संतांची ज्ञानप्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. श्रीसमर्थांचा संत सुद्धा ज्ञानी पुरुष आहे. त्यांनीही त्या संतांची अंतरंग लक्षणे सांगितली. वर सांगितलेल्या वैराग्यादी अंतरंग लक्षणांवरून संतांना ओळखता येते


मग तेच इये शरीरी । जै आपुला प्रभावो करी ।
तैं इंद्रियांच्या व्यापारी । डोळाही दिसे ॥

ती लक्षणे जेव्हा देहात प्रकट होतात तेव्हा इंद्रियांच्या क्रियांवरून ते संत आहेत ही गोष्ट बहिरंगावरून कळून येते. झाडांच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतूचा प्रवेश जाणता येतो, अंकुराच्या लुसलुशितपणावरून जमिनीचे मार्दव समजते, त्याप्रमाणे संतांच्या देहातही मुरलेली ज्ञानलक्षणे त्यांच्या देहाच्या ठिकाणी प्रकट होतात. समर्थ बहिरंग लक्षणे सांगतांना म्हणतात –

नसे गर्व अंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ।
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥

सर्वत्र आत्मदर्शनाचा अनुभव घेत असल्यामुळे संत गर्विष्ठ असत नाहीत. ताठा नसल्यामुळे ते सर्वांशी नम्रपणे वागतात. संत वीतरागी असतात. विषयांपासून अलिप्त असल्यामुळे त्यांना त्या विषयांचा लोभ नसतो. जो मनुष्य विषयांचा लोभी असतो त्याला विषयांनी आनंद मिळतो व मग आणखी आणखी विषय मिळावण्याची स्पृहा निर्माण होते. उलट विषय नाही मिळाले की त्याचा क्षोभ होतो. मग तो क्रोध आवरता आवरत नाही. म्हणून तर गीतेने काम, क्रोध व लोभ यांना नरकाची द्वारे म्हटले आहे व विषयी . माणसाचा अध:पात कसा होतो त्याचेही वर्णन केले आहे. संत मात्र विषयांपासून अलिप्त असतात. त्यामु्ळे विषयी माणसांच्या ठिकाणी असणारे दैन्य त्यांच्या ठिकाणी नसते. उलट त्यांचे अंत:करण क्षमा व शांती यांनी परिपूर्ण असते. ते दयाळू असतात.

असे संतपुरुषच दुसर्‍याचा उद्धार करू शकतात. अशा संतजनांची संगत करावी असे समर्थ म्हणतात.

मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होई रे मोक्षमार्गी विभागी ॥
मना सर्वही संग सोडूनी द्यावा । अति आदरे सज्जनांचा धरावा ।
. जयाचेनि संगे महादु:ख भांगे । जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥
म्हणे दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।
गुरु अंजनेवीण ते आकळेना । जुने ठेवणे मीपणे ते कळेना ॥

समर्थ मनाला सांगतात की मना राग येऊ देऊ नकोस. त्य़ासाठी तू सज्जनांच्या संगतीत रहा. दुष्ट व नीच माणसांची संगत टाळ. म्हणजे तू मोक्षाचा भागिदार होशील. त्य़ांच्या संगतीत मोठी मोठी दु:खे नाहीशी होतात. साधनांचे कष्ट न होता सन्मार्ग सापडतो. अशा आत्मज्ञानी मनुष्यास शरण जावे. ते गुरु आत्मज्ञान देतात. आपले जुने ठेवणे प्राप्त करून देतात. जुने ठेवणे म्हणजे स्वत:जवळच असलेला आत्मस्वरूपाचा ठेवा ते आपल्याला प्राप्त करून देतात. त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होते. संतसंगतीत सन्मार्ग सापडून आत्मस्वरूपचा ठेवा कसा हस्तगत होतो तेही समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितले आहे.


यातला पहिला अडथळा आहे देहबुद्धीचा. गर्भवासात ‘सोऽहम्’ म्हणणारा जीव जन्म घेताच ‘कोऽहम्’ म्हणू लागतो. त्याला स्वत:च्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. नंतर आई-बाबांनी ठेवलेले नाव त्याला चिकटते. त्य़ा नावाबरोबर ‘देह तो मी’ ही भावना दृढ होऊ लागते. ‘मी म्हणजे देह, हे माझे आईबाप, हा माझा गोतावळा, हे माझे धन, घर, बायका मुले, अशी माझेची यादी वाढतच जाते. या सर्वां.मधे खरा मी लपून रहातो. जोपर्यंत खर्‍या मीची, आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत मनुष्य आपले खरे हित करून घेऊ शकत नाही. कारण खरे हित देहातीत आहे. म्हणून ‘देहेबुद्धी ते आत्मबुद्धी’ होण्यासाठी संतांची संगत आवश्यक आहे.

मनुष्य आपला देह व त्यासंबंधाने सभोवती पसरलेला प्रपंच याचीच सतत चिंता करत असतो. आज प्रपंचाकरता ही गोष्ट केली, उद्या ती करीन, त्यासाठी अमूक साहित्य व इतका पैसा कसा आवश्यक आहे, तो मी कसा प्राप्त करीन अशीच चिंता करत असतो. कारण त्या प्रपंचाबद्दल त्याला अतोनात आसक्ती असते. परंतु मनाने योजलेल्या सर्वच गोष्टी सत्यात येतात असे नाही. मग त्यावेळी त्य़ाला आपल्या मर्यादा जाणवतात. तेव्हा प्रपंचात ठेवलेली आसक्ती कशी अनाठायी होती हे त्याला कळून येते. मग तो देवाचा धावा करू लागतो. म्हणून सुरवातीपासून हरिचिंतनात रमून भगवंताशी नाते जोडावे. ते कसे जोडायचे ते संत शिकवतात.

संकल्प विकल्प करणे हा मनाचा स्वभाव आहे. नाना कल्पना करून मन विषयात गुंतून रहाते. जेव्हा मनाची कल्पना करण्याची सवय सुटून ते निर्विकल्प होईल स्वत: निर्मण केलेल्या दृश्यापासून स्वत: बाजूस होईल त्यावेळी त्रिगुणातीत देव अनुभवता येईल. कल्पनातीत कसे व्हावे ते संतांच्या संगतीत शिकता येते. (

अहंकार वाढला म्हणजे मनुष्य स्त्री, पुत्र, आप्त, स्वकीय, विद्या, कला वगैरे नाना मोहात अडकून पडतो. ‘मी देह नसूनही मी देह आहे’ असे वाटणे म्हणजे भ्रांती अथवा विपरीत ज्ञान. य़ा विपरीत ज्ञानामुळेच मनुष्याला जन्ममृत्यूचे फेरे फिरावे लागतात. अनेक दु:खे भोगावी लागतात व पुन्हा पुम्हा जन्म घ्यावा लागतो. हे विपरीत ज्ञान दूर कसे करावयाचे ते संतसंगतीत शिकता येते. एक आत्मतत्व शाश्वत आहे. बाकी सर्व दृश्य पसारा हा अशाश्वत आहे. हा आत्मानात्नविवेक व अभ्यास कसा करावा ते संतसंगतीत शिकता येते.

 संत आपल्याला सन्मार्ग कसा दाखवतात त्याचे समर्थांनी दिग्दर्शन केले आहे. अशा संतांजवळ ‘नसे संत आनंत संता पुसावा’ ज्याला अंत नाही ते अनंत परमात्मस्वरूप कसे आहे त्याची विचारणा करावी. संतांकडे लौकिक प्रपंचातील सुखासाठी कधीही विचारणा करू नये. त्यांच्या संगतीत शाश्वत सत्यच जाणून घ्यावे. अर्थातच त्यासाठी प्रथम आपल्या देहबुद्धीचा निरास व्हावयास हवा. देहबुद्धी क्षीण होईल तेव्हाच आत्मविषयक जिज्ञासा निर्माण होईल.  मग संत कसा उपदेश करतात ते सांगतांना समर्थ म्हणतात –

महावाक्य तत्वादिके पंचिकर्णे । खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ।
द्वितीयेस संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥

संत ‘तत्वमस्यादि’ महावाक्याचा उपदेश करतात. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार देहांची तत्वे, सूक्ष्म पंचमहाभूते, ती एकमेकात मिसळून पंचीकरणाने स्थूल रूप कसे प्राप्त करतात, त्या तत्वांना आधारभूत असणारे ब्रह्मतत्व याचे संत दिग्दर्शन करतात. नाशिवंत पदार्थांच्या पलिकडे असणारे ब्रह्मतत्व हे आपले रूप आहे हे जाणणे हा अनुभवाचा विषय आहे. द्वितीयेची चंद्रकोर झाडाच्या फांदीच्या खुणेच्या आधाराने दाखवावी त्याप्रमाणे संत महावाक्यांच्या आधाराने ब्रह्मवस्तू अनुभवाच्या कक्षेत आणण्याची युक्ती शिकवतात. परमार्थात या अनुभवाला महत्व आहे.

संत नेहेमी विचारपूर्वक बोलतात व विवेकाने चालतात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचा विवेक दृगोचर होत असतो. त्यांच्या सहवासाने दु:खी माणसांना सुद्धा समाधान लाभते. विचारपूर्वक कसे बोलावे ते त्यांच्या संगतीत शिकता येते. अविवेकाने वागणेच मनुष्याला दु:ख भोगावयास लावते. हा विवेकच संत शिकवतात.

संतांचे भगवंतावर नि:सीम प्रेम असते. विरक्ती हे त्यांचे मुख्य लक्षण असते. ते स्वरूपानुसंधानी रत असतात. त्यांच्या दर्शनाने वा स्पर्शाने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. त्यांच्या सहवासाचा मुख्य परिणाम म्हणजे त्यांच्या भाषणाने मनातील दुष्ट संशय नाहीसे होतात.

सदासर्वदा सज्जनांचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥

आचरणत बदल घडणे व देवावर प्रेम जडणे हे सत्संगतीचे दोन परिणाम समर्थांनी या श्लोकात वर्णिले आहेत. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. ‘सदाचार हा थोर सांडू नये तो’ असे समर्थ म्हणतातच. क्रोध, लोभ, मोह हे रिपु मनुष्याला सदाचरणापासून दूर नेतात. सत्संगतीने लोभ, मोह व क्रोध यावर ताबा कसा मिळवावयाच ते शिकता येते. त्यांच्या संगतीने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. भगवंतावर प्रेम करण्याची कला शिकता येते. तत्वनिर्णयासाठी होणारे वाद संपून तत्वानुकूल संवाद घडू लागतो.

भगवंताच्य़ा प्राप्तीच्या आड येणार्‍या वासना, कामना व कल्पना नाहीशा होण्यास संतांचा सहवास अत्यंत उपयुक्त ठरतो. मनातीत होऊन उत्तम गती प्राप्त कशी करता येते ते संतांच्या सहवासाने कळते.
 मनाला पुन्हा पुन्हा समजाऊन सत्याचा चिकाटीने कसा शोध घ्यावयाचा, सद्वस्तूचे निश्चित ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावयाचे ते सत्संगाने कळते. पिंडज्ञान, तत्वज्ञान, संगीतदी कला, योगाभ्यास, यज्ञयाग, भोगत्याग यामधे खरे समाधान नसून ते सज्जनांच्या संगतीतच प्राप्त होते.

मना संग हा सर्व संगास तोडी । मना संग मोक्ष तात्काळ जोडी ।
मना संग हा साधका शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत नि:शेष मोडी ॥

संतसहवासाने ‘मी देह’ हा भ्रम क्षीण होऊ लागतो व साधक फार लवकर आपल्या ध्येयाप्रत पोचतो. द्वैत अजिबात नाहीसे होते व तो आत्मज्ञानी दृढ रहातो.

म्हणून समर्थांची साधकांना कळकळीची विनंती आहे की

धरी रे मना संगती सज्जनांची । जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥

सत्संगतीने दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते. सद्भाव सद्बुद्धी व सन्मार्ग प्राप्त होतो व महाभयंकर अशा मृत्यूचे भय सुद्धा रहात नाही. त्यामुळे शेवटच्या श्लोकात सांगितलेली ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य ही फलश्रुती प्राप्त होते.Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व