श्रीकल्याणस्वामी महाराज स्वानुभवपूर्वक सांगतात


गे बाईये स्वामी तो आठवे मनीं । नित्य बोलतां चालतां जनीं ।
स्वप्न सुषुप्ती जागृती मौनी । खंड नाहींच अखंड ध्यानीं ।।

अलभ्याचा हा लाभ मज जाहला । विश्वजनासी उपेगा आला ।
कीर्तिरूपेंचि विस्तारला । दाही दिशा भरोनि पुरवला ।।

भक्तिप्रेमाचें तारूं उतटलें । ज्ञानवैराग्यतीरीं लागलें।
संतसज्जनीं सांठवीलें । हीनदीनासि तिहीं उद्धरिलें ।।

ज्याच्या गुणांसी नाहीं गणना । ज्याच्या कीर्तीसी नाहीं तुळणा ।
जो स्वयंभ श्रीगुरुराणा । ब्रह्मादिकांसी बुद्धी कळेना ।।धर्मस्थापना स्थापियेली । न्यायें नीतीनें भक्ति वाढविली ।
संतमंडळी ते निवाली । बहु दास ते भूमंडळी ।। 

जन्मजन्मांतरीं पुण्यकोटी। बहु संचित होतें गांठी ।
योगिरायाची जाली ज्यास भेटी । त्यास कल्याण होये सृष्टी ।।


श्रीसमर्थांची काव्यरचना इतकी विपुल आहे की, खरेतर तिला ‘ कवितासमुद्र ‘ असे म्हणणेच शोभून दिसेल.

हे सारे वाङ्मय वेळोवेळी साक्षेपाने लिहून ठेवण्याचे कार्य श्रीसमर्थांचे पट्टशिष्य श्री. अंबाजी कृष्णाजीपंत कुलकर्णी उपाख्य ‘ श्रीकल्याणस्वामी ‘ महाराजांनी मोठ्या निगुतीने व श्रद्धाप्रेमाने केलेले आहे. म्हणूनच त्यांचे गुरूबंधू ‘ अनंत कवी ‘ आदराने लिहितात की , ‘ स्वामींचा कवितासमुद्र, अवघा कल्याण लिहितसे । ‘ .
याच श्रीकल्याणस्वामी महाराजांच्या तीन मार्मिक अभंगरचनांचा आस्वाद, आपण त्यांच्याच कृपेने आता घेणार आहोत.

‘ श्रीकल्याणस्वामी महाराज ‘ म्हणजे साक्षात् सद्गुरुभक्तीच ! आपली सगळी हयात त्यांनी सांप्रदायिक प्रसारकार्यात, सद्गुरुसेवेतच घालवली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात, ‘ डोमगाव ‘ येथे श्रीकल्याणस्वामी महाराजांचा मठ आजही विद्यमान आहे.

मुदगल, सामराज, हरि, दिगंबर वगैरे मोठी शिष्यपरंपरा श्रीकल्याणस्वामींनी निर्माण केली होती. प्रचंड शरीरबल, टापटीप, स्वच्छता, कार्यतत्परता, सुंदर हस्ताक्षर इत्यादी अनेक लौकिक, अलौकिक सदगुणांची खाण असलेले श्रीकल्याणस्वामी, श्रीसमर्थांच्या खालोखाल सर्वत्र ख्यातनाम आहेत. प्रस्तुत आत्मकथनपर अभंग, हा श्रीकल्याणस्वामी महाराजांच्या उत्कट सदगुरुप्रेमाचाच एक सुंदर अनुकार आहे. आपल्या विश्ववंद्य सद्गुरूंची सुकीर्ती गाताना ते येथे म्हणतात की;
” ( बाई गं, ते समर्थ सद्गुरु स्वामी महाराज मनात आठवीत जावेत. किंवा) अगे बाई; त्या सद्गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांचे स्मरण ( त्यांच्याच कृपेने) मला होत असते. (एरवी देखील) नित्य चालताना, बोलताना, लोकांमध्ये, स्वप्नात, सुषुप्तीत, जागृतीत, मौनात त्यांच्याच अखंड स्मरणात, ध्यानात माझे मन तल्लीन राहते. त्यात कधी खंड पडत नाही.

जी लाभणे अतिशय कठीण; अशा सद्गुरूप्रेमकृपेचा ‘लाभ’ मला (अनायासे) झालेला आहे. हाच लाभ (इतर) जगाला , लोकांनाही उपयोगाला आलेला आहे. सद्गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या कीर्तिरूपाने विस्तारून तो ‘ लाभ’ दाही दिशांना पुरून उरलेला आहे.
( त्यांच्याच कृपेने, करुणेने) हे भक्तिप्रेमाचे तारू, सुखरूपपणे साधकांना ज्ञानवैराग्याच्या तीरी आणून ठेवते. संतसज्जनांनी हाच ‘ लाभ’ ( वेळोवेळी) साठवून ठेवला. हीन – दीन जनांनाही याच ‘ लाभा’ ने उद्धारले आहे.

माझ्या स्वयंभू अशा श्रीसद्गुरु स्वामीराजांच्या गुणांना काही गणनाच नाही; त्यांच्या ( विमल- ) सत्कीर्तीलाही काही तुलना नाही. ब्रह्मा, विष्णू आदी देवांनाही त्यांच्या ( अनंत अपार) सामर्थ्याचे आकलन पूर्णपणे होऊ शकत नाही.

माझ्या सद्गुरुस्वामींनी ( सर्वत्र) धर्मस्थापना केली. न्यायनीतिपूर्वक भक्तीचा ( सर्वदूर) प्रसार केला. (आपल्या ज्ञान – वैराग्य भक्तीने) अनेक संतमहात्म्यांची अंत:करणे त्यांनी निवविली; त्याचप्रमाणे या भूमंडळावर प्रभू श्रीरामचंद्रांचे (माझ्यासारखे) अनेक (निष्ठावंत) ‘ दास’ (भक्तश्रेष्ठ साधक) निर्माण केले.

मागील अनेक जन्मांचे सुकृत माझ्या गाठीशी असल्यानेच, या सद्गुरू योगिराजांची भेट (या जन्मी मला) घडू शकली. अशी त्यांची भेट ज्याला लाभते, त्याचेच या सृष्टीत सर्वतोपरी ‘कल्याण’ होत असते! (असे श्रीकल्याणस्वामी महाराज स्वानुभवपूर्वक सांगतात.)

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व