आध्यात्म म्हणजे काय

🙏आध्यात्म म्हणजे काय 🙏


व्याख्या:

(१) सर्वसाधारणपणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो. ते बरोबर की चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.

(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय.

(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजून घेणे व त्यावर (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे, त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म. आध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.

(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.
(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे आध्यात्म.

(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे आध्यात्म.

(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.

(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढवून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो. भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो. सुखी भावना जर सुखी करते तर सर्वच भावना सुखकारक करण्यासाठी काम करणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.

(९) सत्य जाणून घेणे. वस्तूस्थिती ही सत्य व माया ही असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवशक असतेच. म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे आध्यात्म.

(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते, अन्य कोठेही नसते. नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढून टाकायला शिकवणारे शास्त्र आणि मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते. मग त्या अनुषंगाने परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे आध्यात्म.

(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो. अशा द्वैताकडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही, केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेलाच असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.

(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.

(१३) देहबुद्धीच्या पलीकडे जाणे/स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रममाण असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म. देहबुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावश्यक क्रिया विसरणे. याने काही नुकसान न होता आध्यात्मात प्रगतीचे असणारे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे..

(१४) मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी आध्यात्म. आध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र आध्यात्मात आहे. आणि संपूर्ण आध्यात्म हे नामात आहे!

(१५) आध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतून ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दूर करण्याच्या प्रयत्नात असते. आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे. पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मातही प्रतिस्पर्धी हवा.

(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते आध्यात्म. आध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते आध्यात्म.

(१७) वरील १६ व्याख्यांपैकी …………….. काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे की- ज्याला पैसा लागत नाही ते म्हणजे आध्यात्म..

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व