दशक चवथा नवविधाभक्ति : समास चवथा : पादसेवनभक्तिनिरुपण

दशक चवथा नवविधाभक्ति : समास चवथा : पादसेवनभक्तिनिरुपण

॥श्रीराम॥ मागां जालें निरूपण नामस्मरणाचें
लक्षण आतां ऐका पादसेवन चौथी भक्ती ||||
पादसेवन तेंचि जाणावें काया वाचा मनोभावें |
सद्गुरूचे  पाय  सेवावे  |  सद्गतिकारणें  ||||
या नांव पादसेवन सद्गुरुपदीं अनन्यपण |
निरसावया जन्ममरण यातायाती  ||||
सद्गुरुकृपेविण कांहीं भवतरणोपाव तों नाहीं |
याकारणें लवलाहीं सद्‍गुरुपाय  सेवावे  ||||
सद्वस्तु  दाखवी  सद्‍गुरु सकळ सारासार-
विचारु परब्रह्माचा निर्धारु अंतरीं बाणे ||||
जे वस्तु दृष्टीस  दिसेना  |  आणी मनास तेहि
भासेना संगत्यागेंविण येना अनुभवासी ||||
अनुभव घेतां संगत्याग नसे संगत्यागें अनुभव न
दिसे हें अनुभवी यासीच भासे येरां गथागोवी ||||
संगत्याग आणी निवेदन विदेहस्थिती अलिप्तपण |
सहजस्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही येकरूप ||||
याहिवेगळीं नामाभिधानें समाधानाचीं संकेतवचनें |
सकळ  कांहीं  पादसेवनें  |  उमजों  लागे ||||
वेद वेदगर्भ वेदांत सिद्ध सिद्धभाव गर्भसिद्धांत |
अनुभव अनुर्वाच्य  धादांत सत्य  वस्तु ||१०||
बहुधा अनुभवाचीं आंगें सकळ कळती संतसंगें |
चौथे  भक्तीचे  प्रसंगें  |  गोप्य तें प्रगटे  ||११||
प्रगट  वसोनि  नसे  |  गोप्य  असोनि भासे |
भासाअभासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग ||१२||
मार्ग होये  परी  अंतरिक्ष  |  जेथें  सर्वही
पूर्वपक्ष पाहों जातां अलक्ष लक्षवेना ||१३||
लक्षें जयासी लक्षावें  |  ध्यानें  जयासी ध्यावें |
तें गे तेंचि आपण व्हावें त्रिविधा प्रचिती ||१४||
असो हीं अनुभवाचीं द्वारें कळती सारासारविचारें |
सत्संगेंकरून  सत्योत्तरें  |  प्रत्ययासि येती ||१५||
सत्य पाहातां नाहीं  असत्य असत्य पाहातां नाहीं
सत्य सत्याअसत्याचें कृत्य पाहाणारापासीं ||१६||
पाहाणार पाहाणें जया लागलें तें तद्रूपत्वें प्राप्त
जालें तरी मग जाणावें बाणलें समाधान ||१७||
नाना समाधानें पाहातां बाणती सद्गुरु करितां |
सद्‍गुरुविण  सर्वथा  |  सन्मार्ग  नसे  ||१८||
प्रयोग साधनें सायास नाना साक्षेपें विद्याभ्यास |
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास पाविजेत नाहीं ||१९||
जें अभ्यासें अभ्यासितां नये जें साधनें असाध्य
होये तें हें सद्‍गुरुविण काये उमजों जाणे ||२०||
याकारणें ज्ञानमार्ग कळायाधरावा सत्संग |
सत्संगेंविण  प्रसंग  |  बोलोंचि नये  ||२१||
सेवावे सद्गुरूचे चरण या नांव पादसेवन |
चौथे भक्तीचें लक्षण तें हें निरोपिलें ||२२||
देव ब्राह्मण माहानुभाव  |  सत्पात्र  भजनाचे
ठाव ऐसिये ठाईं सद्भाव दृढ धरावा ||२३||
हें प्रवृत्तीचें बोलणें बोलिलें रक्षाया कारणें |
परंतु सद्गुरुपाय सेवणें या नाव पादसेवन ||२४||
पादसेवन चौथी भक्ती पावन करितसे त्रिजगतीं |
जयेकरितां सायोज्यमुक्ती साधकास होये ||२५||
म्हणौनि थोराहून थोर चौथे भक्तीचा निर्धार |
जयेकरितां पैलपार बहुत प्राणी पावती ||२६||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पादसेवनभक्तिनिरुपणनाम समास चवथा || .४ ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व