दशक पांचवा मंत्रं : समास दहावा : सिद्धलक्षण

दशक पांचवा मंत्रं : समास दहावा : सिद्धलक्षण

॥श्रीराम॥मागें बोलिला संसारिक त्यागेंविण नव्हे
कीं साधक ऐका हो याचा विवेक ऐसा असे ||||
सन्मार्ग  तो  जीवीं धरणें अनमार्गाचा  त्याग
करणें संसारिकां त्याग येणें प्रकारें ऐसा ||||
कुबुद्धित्यागेंविण कांहीं सुबुद्धि लागणार नाहीं |
संसारिकां  त्याग  पाहीं  |  ऐसा  असे ||||
प्रपंचीं वीट मानिला मनें विषयेत्याग केला |
तरीच पुढें  आवलंबिला परमार्थमार्ग  ||||
त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा |
त्याग  घडे  अज्ञानाचा  |  शनै  शनै ||||
ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग उभयांस घडे सांग |
निस्पृंहास  बाह्यत्याग विशेष  आहे ||||
संसारिका ठाईं ठाईं बाह्य त्याग घडे कांहीं |
नित्यनेम  श्रवण  नाहीं त्यागेंविण ||||
फिटली आशंका स्वभावें त्यागेंविण साधक
नव्हे पुढें कथेचा अन्वय सावध ऐका ||||
मागां झालें निरूपण साधकाची वोळखण |
आतां सांगिजेल खूण सिद्ध लक्षणाची ||||
साधु वस्तु होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला |
निश्चयें  चळेना  ऐसा झाला या नाव सिद्ध ||१०||
बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणीं नाहीं जाण |
मुमुक्षपणाचें लक्षण साधकपणीं नाहीं ||११||
साधकासि  संदेहवृत्ती पुढें  होतसे  निवृत्ती |
याकारणें निःसंदेह श्रोतीं साधु वोळखावा ||१२||
संशयरहित ज्ञान तेंचि साधूचें लक्षण |
सिद्धाआंगीं संशय हीन लागेल कैसा ||१३||
कर्ममार्ग संशये भरला साधनीं संशये कालवला |
सर्वांमध्यें संशये भरला साधु तो निःसंदेहे ||१४||
संशयाचें ज्ञान खोटें संशयाचें वैराग्य पोरटें |
संशयाचें  भजन  वोखटें निर्फळ होय ||१५||
वेर्थ संशयाचा देव वेर्थ संशयाचा भाव |
वेर्थ संशयाचा स्वभाव सर्व कांही ||१६||
वेर्थ संशयाचें व्रत वेर्थ संशयाचें तीर्थ |
वेर्थ संशयाचा परमार्थ निश्चयेंवीण ||१७||
वेर्थ संशयाची भक्ती वेर्थ संशयाची प्रीती |
वेर्थ संशयाची संगती संशयो वाढवी ||१८||
वेर्थ संशयाचें जिणें वेर्थ संशयाचें धरणें |
वेर्थ संशयाचें  करणें सर्व  कांहीं  ||१९||
वेर्थ संशयाची पोथी वेर्थ संशयाची वित्पत्ती |
वेर्थ  संशयाची  गती निश्चयेंविण  ||२०||
वेर्थ संशयाचा दक्ष वेर्थ संशयाचा पक्ष |
वेर्थ संशयाचा मोक्ष होणार नाहीं ||२१||
वेर्थ संशयाचा संत वेर्थ संशयाचा पंडित |
वेर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चयेंविण ||२२||
वेर्थ संशयाची श्रेष्ठता वेर्थ संशयाची वित्पन्नता |
वेर्थ  संशयाचा  ज्ञाता  |  निश्चयेंविण  ||२३||
निश्चयेंविण सर्व कांहीं अणुमात्र तें प्रमाण
नाहीं वेर्थचि पडिले प्रवाहीं संदेहाचे ||२४||
निश्चयेंविण जें बोलणें तें अवघेंचि कंटाळवाणें |
बाष्कळ  बोलिजे  वाचाळपणें  निरार्थक ||२५||
असो निश्चयेंविण जे वल्गना ते अवघीच विटंबना |
संशयें  काहीं  समाधाना  |  उरी  नाहीं  ||२६||
म्हणोनि संदेहरहित ज्ञान निश्चयाचें समाधान |
तेंचि  सिद्धांचें  लक्षण  |  निश्चयेंसीं  ||२७||
तव श्रोता करी प्रश्न निश्चयो करावा कवण |
मुख्य निश्चयाचें लक्षण मज निरोपावें ||२८||
ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा |
नाना देवाचा  वळसा करूंचि  नये ||२९||
जेणें निर्मिलें सचराचर त्याचा करावा विचार |
शुद्ध विवेकें  परमेश्वर  |  वोळखावा  ||३०||
मुख्य देव तो कवण भक्ताचें  कैसें  लक्षण |
असत्य सांडून वोळखण सत्याची धरावी ||३१||
आपल्या देवास वोळखावें मग मी कोण हें
पाहावें संग त्यागून राहावें वस्तुरूप ||३२||
तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो |
पाहावा  भूतांचा  अन्वयो  |  वितिरेकेंसीं  ||३३||
पूर्वपक्षेसि सिद्धांत पाहावा प्रकृतीचा अंत |
मग पावावा निवांत निश्चय देवाचा ||३४||
देहाचेनि योगें संशयो करी समाधानाचा क्षयो |
चळों  नेदावा  निश्चयो  |  आत्मत्वाचा ||३५||
सिद्ध असतां आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान |
याकारणें  समाधान  |  आत्मनिश्चयें राखावें ||३६||
आठवतां देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी |
याकारणें आत्मबुद्धी सदृढ करावी ||३७||
आत्मबुद्धि निश्चयाची तेचि दशा मोक्षश्रीची |
अहमात्मा  हें कधींचि विसरों  नये  ||३८||
निरोपिलें निश्चयाचें लक्षण परी हें न कळे सत्संगें-
विण संतांसि गेलिया शरण संशये तुटती ||३९||
आतां असो हें बोलणें ऐका सिद्धांचीं लक्षणें |
मुख्य  निःसंदेहपणें  |  सिद्ध  बोलिजे ||४०||
सिद्धस्वरूपीं नाहीं देहो तेथें कैंचा हो संदेहो |
याकारणें  सिद्ध  पाहो  |  निःसंदेही  ||४१||
देहसमंधाचेनि  गुणें लक्ष्णासि  काये  उणें |
देहातीताचीं लक्षणें काये म्हणोनि सांगावीं ||४२||
जें लक्षवेना चक्षूसी त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं |
निर्मळ  वस्तु  सिद्ध  त्यासी लक्षणें कैंचीं ||४३||
लक्षणें म्हणिजे केवळ गुण वस्तु ठाईची निर्गुण |
तेंचि  सिद्धांचें  लक्षण  |  वस्तुरूप  ||४४||
तथापि ज्ञानदशकीं बोलिलें म्हणौनि वगतृत्व आटोपिलें |
न्यूनपूर्ण  क्ष्मा  केलें  |  पाहिजे  श्रोतीं  ||४५||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम
समास दहावा || .१० || दशक पाचवा समाप्त ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व