दशक पहिला स्तवन :समास दुसरा : गणेशस्तवन


दशक पहिला स्तवन :समास दुसरा : गणेशस्तवन
॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥ माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥ तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥ येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं । होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥ म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर । आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥ वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥ सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥ सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत । हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥ भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड । विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥ नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें । तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥ मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें । लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥ चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी । लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥ रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ । कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥ दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट । तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥ लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद । क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥ चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर । फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥ डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी । उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥ नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां । रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥ शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ । येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥ नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥ स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण । साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥ रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें । घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥ ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा । साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥ ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु । त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥ ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥ जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥ जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण । तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥ ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ । सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥ ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति । वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २॥

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व