दशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन


दशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन
श्रीराम ॥ आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान । जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥ जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ । तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥ वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥ जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले । पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥ हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥ सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥ जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥ चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी । वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥ वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥ तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥ विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची । मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥ वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें । या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥ संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥ संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र । नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥ संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार । नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥ संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो । संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥ मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥ जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥ माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥ जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन । तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥ जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे । तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥ ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व