दशक पहिला स्तवन :समास पहिला : ग्रंथारंभलक्षण

|| श्रीरामसमर्थ ||
|| श्रीमत् दासबोध ||
दशक पहिला स्तवन :समास पहिला : ग्रंथारंभलक्षण


॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥ नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥ ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥ नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥ नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥ शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥ भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता । गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥ इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥ भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥ पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥ आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥ मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥ नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥ योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥ भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥ आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥ बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष । अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥ नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥ नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥ ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व